

नवी मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.) - जागतिक पातळीवरील आघाडीची ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी सिगेनेर्जीने (SIGENERGY) नवी मुंबईत आपल्या नव्या 'एक्सपिरियन्स सेंटर'ची अधिकृत घोषणा केली आहे. भारतातील हरित व डिजिटल ऊर्जा प्रवासाला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे कंपनीची भारतीय बाजारातील उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे.
'सिगेनेर्जी डे इंडिया २०२६' या विशेष कार्यक्रमांतर्गत नवी मुंबईतील टीटीसी एमआयडीसी येथे या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हे सेंटर केवळ उत्पादनांचे प्रदर्शन नसून, ग्राहकांसाठी आणि सौर क्षेत्रातील व्यावसायिक, इन्स्टॉलर्स तसेच डिस्ट्रिब्युटर्ससाठी एक आधुनिक आणि परस्परसंवादी ज्ञानकेंद्र म्हणून कार्य करेल. या ठिकाणी सौर पीव्ही इनव्हर्टर, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम, ईव्ही चार्जिंग आणि एआय-आधारित ऊर्जा व्यवस्थापन प्रणालीचे एकाच छताखाली प्रात्यक्षिक अनुभवता येणार आहे.
या प्रसंगी बोलताना सिगेनेर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिलाष बोराणा म्हणाले की, भारत सध्या स्वच्छ ऊर्जेच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. सौर ऊर्जेचा वेगाने होणारा विस्तार, ईव्हीचा वाढता वापर आणि एआय तंत्रज्ञानाची जोड यामुळे ऊर्जेचे नियोजन अधिक स्मार्ट होत आहे. नवी मुंबईतील हे एक्सपिरियन्स सेंटर म्हणजे आमची भारतातील दीर्घकालीन कटिबद्धता आहे. केवळ कागदावर किंवा प्रेझेंटेशनमध्ये न दाखवता, आमची एकात्मिक ऊर्जा प्रणाली प्रत्यक्ष कशी काम करते याचा अनुभव येथे सर्वांना घेता येईल.
कंपनीने आपल्या 'ईपीसी कनेक्ट २०२६' या उपक्रमाद्वारे स्थानिक भागीदारांशी तांत्रिक संवाद वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. सिगेनस्टॉर, सिगेनस्टॅक, आणि मायसिगेन यांसारख्या एआय-संचालित उत्पादनांमुळे भारतीय ऊर्जा क्षेत्राला अधिक सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत बनवण्यास मोठी मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी