
न्यायालयीन सुविधांच्या विकेंद्रीकरणामुळे ग्रामीण भागाला मोठा दिलासा : न्यायमूर्ती माधव जामदार
रत्नागिरी, २२ ऑगस्ट (हिं.स.) : चिपळूण येथे नूतन दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना झाल्याने तालुक्याच्या न्यायिक व्यवस्थेत महत्त्वाची भर पडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते या न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी न्यायमूर्ती जामदार यांनी चिपळूणशी असलेले आपले जुने नाते आणि पूर्वजांचा या शहराशी असलेला संबंध सांगत, चिपळूणचा सुपुत्र म्हणून येथे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे व्यक्त केले.
“चिपळूण तालुक्यातील एका गावातून सुमारे दीडशे वर्षांपूर्वी आमचे पूर्वज पुण्याला गेले. माझे वडील न्यायाधीश होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरण्याची संधी मला मिळाली; मात्र चिपळूणशी असलेले माझे नाते कायम राहिले,” असे त्यांनी सांगितले.
चिपळूणमध्ये तालुका स्तरावरील सर्व न्यायिक व्यवस्था उपलब्ध झाल्याचे नमूद करताना न्या. जामदार म्हणाले की, ही सुविधा केवळ शहरातील नागरिकांसाठी नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. न्यायालयीन सुविधांचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे पक्षकारांचा प्रवासाचा वेळ, खर्च आणि गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील मर्यादित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाही त्यांनी उल्लेख केला. काही गावांमध्ये दिवसातून एसटीची केवळ एकच फेरी उपलब्ध असते, तर अनेक नागरिकांकडे खासगी वाहने नसतात. त्यामुळे न्यायालयीन कामासाठी दूरच्या ठिकाणी जाणे पक्षकारांसाठी अडचणीचे ठरते. या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्येच वरिष्ठ स्तरावरील न्यायालय उपलब्ध होणे हा महत्त्वाचा बदल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कोकण ही परशुरामाची भूमी असून त्यांच्या धैर्य, धाडस आणि बुद्धिमत्तेचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कोणताही वाद न्यायालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सामोपचाराने सोडविण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन न्या. वेणेगावकर यांनी केले. न्यायालयीन प्रक्रियेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मध्यस्थी आणि परस्पर सामंजस्याला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच ज्येष्ठ वकिलांनी तरुण वकिलांना याबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड. नितीन सावंत यांनी केले. चिपळूणमध्ये दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची आवश्यकता, त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न तसेच विविध व्यक्ती आणि संस्थांकडून मिळालेले सहकार्य याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विनोद जाधव, चिपळूणचे नवनियुक्त दिवाणी न्यायाधीश गौतम दिवाण, रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष ऍड. विलास पाटणे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ऍड. हर्षद भडभडे, चिपळूण तालुका वकील संघाचे पदाधिकारी, न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ॲड. नयना पवार यांनी मानले.
------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी