
छत्रपती संभाजीनगर, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। महिलांची सुरक्षा हा केवळ कायदा व सुव्यवस्थेचा विषय नसून, सुशासनाचा महत्त्वाचा निकष आहे. पीडित महिलेचे म्हणणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता शांतपणे ऐकावे आणि तिच्या सन्मानाची काळजी घ्यावी. गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबताना पीडितांबाबत कमाल संवेदनशीलता राखणे, हे प्रभावी पोलीस व्यवस्थेचे सूत्र असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने आयोजित ‘शक्ती व सुरक्षा’ कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमतावृद्धी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य सचिव सुदीप जैन, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती साधना जाधव, राज्याच्या महिला गुन्हे प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या सचिव नंदिनी आवाडे, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, राष्ट्रीय महिला आयोगाचे संचालक राम अवतार सिंह व समन्वयक सर्वेश पांडे आदी उपस्थित होते.
श्रीमती रहाटकर म्हणाल्या की, केवळ तक्रार स्वीकारून किंवा एफआयआर नोंदवून पोलिसांचे कर्तव्य संपत नाही. पीडित महिलेला वन स्टॉप सेंटर, संरक्षण अधिकारी व मोफत कायदेशीर मदतीची माहिती देऊन संबंधित यंत्रणांशी जोडून द्यावे. पोलीस, संरक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभाग आणि इतर यंत्रणांमध्ये समन्वय वाढवावा.
त्या पुढे म्हणाल्या की, तक्रारदार महिलेबाबत कोणताही पूर्वग्रह ठेवू नये. तिला पुरेसा वेळ देऊन तिचे म्हणणे मध्येच न तोडता ऐकून घ्यावे. आघातामुळे घटनेचा क्रम सांगताना पीडितेला अडचण येऊ शकते. त्यामुळे घाईघाईने निष्कर्ष काढू नयेत. सन्मानपूर्वक वागणुकीतून तिचा पोलिसांवरील विश्वास वाढतो.
बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल आर्थिक फसवणुकीसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान, माहिती आणि वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा. महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची माहिती देणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक तक्रार गांभीर्याने घेऊन तपास निष्पक्षपणे व वेळेत पूर्ण करावा. ‘सुरक्षित महिला म्हणजे सक्षम समाज आणि सक्षम समाज म्हणजे सक्षम राष्ट्र,’ हे सूत्र लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे. महाराष्ट्र पोलीस महिलांना न्याय देण्यासाठी प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis