
बीड, 22 ऑगस्ट (हिं.स.) श्री क्षेत्र चाकरवाडी येथील ज्ञानोबा आनवणे (माऊली) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच चाकरवाडीसह परिसरातील भाविक, भक्तगण, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली.
ज्ञानोबा माऊली हे माऊली दादा महाराजांची अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने सेवा करणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करणे, हीच आपली जबाबदारी आणि भक्ती मानून त्यांनी आयुष्य व्यतीत केले.
श्री क्षेत्र चाकरवाडीशी त्यांचे अतूट नाते होते. भाविकांशी आपुलकीने वागणे, सर्वांशी मनमोकळेपणाने संवाद साधणे आणि मनातले स्पष्टपणे बोलणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष गुण होता. त्यांच्या साधेपणा, आपलेपणा आणि सेवाभावी वृत्तीमुळे ते अनेकांच्या जिव्हाळ्याचे झाले होते.
माऊली दादा महाराजांच्या सेवेत त्यांनी दिलेले योगदान आणि चाकरवाडीतील भाविकांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने सेवाभावी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis