
अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.)। कृषी विभागाच्या नविन आकृतीबंधास स्थगिती देण्यात आली असून यामध्ये बदल करण्यात येणार आहेत. राज्यातील सहा संघटनांनी या नव्या आकृतीबंधास विरोध केल्यानंतर व आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आगामी सुधारीत आकृतीबंधात भौगोलीक क्षेत्रावर आधारीत सहायक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची पदनिर्मिती होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने मंजूर केलेला कृषी विभागाचा नवा आकृतीबंद रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषीसेवा महासंघ, महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटना, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य उप कृषी अधिकारी संघटना व महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटना या सहा संघटनांनी एल्गार पुकारला होता. येत्या ४ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
नविन आकृतीबंधात क्षेत्रीय स्तरावर १५०० खातेदारांमागे एक सहायक कृषी अधिकारी अशी मान्यता देण्यात आली होती. याचा मोठा परिणाम विदर्भातील शेतीवर होणार आहे. उपकृषी अधिकाऱ्यांची पदे मुख्यालयात देण्यात आल्याने प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा कमी करून त्यांना कार्यालयीन काम देण्यात आले आहे. कृषी विभागाचा आकृतीबंध अतांत्रिक असून तो रद्द करावा तसेच तज्ज्ञ समिती गठीत करून शेतकरी केंद्रीत नवा आकृतीबंध तयार करावा, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. संघटनांचा वाढता विरोध व आंदोलनाची भूमिका बघता नविन आकृतीबंधास स्थगिती देण्यात आली आहे. या आकृतीबंधात भौगोलीक क्षेत्रानुसार पद असा बदल करण्याचे नियोजन असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासकीय गरज, भौगोलीक परिस्थिती, पेसा क्षेत्र तसेच वाढत्या योजनांचा आवाका लक्षात घेता सहाय्यक कृषी अधिकारी आणि उपकृषी अधिकारी पदे वाढविण्यासाठी अंतर्गत बदल करण्यात येणार आहेत, असे कृषी मंत्र्यांनी म्हटले असल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी