
नांदेड, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
सध्या साखरेला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखान्यांना निश्चितच अधिक उत्पन्न मिळत आहे. अशा परिस्थितीत राबराब राबून ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाचा आणि मेहनतीचा योग्य मोबदला देणे ही साखर कारखानदारांची नैतिक जबाबदारी आहे, असे शेतकरी संघर्ष समिती, हदगावचे
आत्माराम पाटील वाटेगावकर यांनी सांगितले.
याच शेतकरीहिताच्या भूमिकेतून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनीही सोमेश्वर कारखान्याचा आदर्श घेऊन साखरेच्या वाढलेल्या दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून द्यावा आणि मागील काळात दिलेल्या दरापेक्षा किमान ₹४०० अधिकचा भाव शेतकऱ्यांना द्यावा.
कारण हा ऊस केवळ शेतात पिकत नाही; त्यामागे शेतकऱ्याचे दिवस-रात्र कष्ट, वाढता उत्पादन खर्च, पाणी, वीज, खते, औषधे, मजुरी आणि अनेक अडचणींशी केलेला संघर्ष दडलेला असतो.
आज साखरेला चांगला भाव मिळत असताना त्याचा योग्य वाटा ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हातात जाणे आवश्यक आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची हीच योग्य वेळ आहे.
शेतकरी जगला तरच साखर कारखाने जगतील आणि साखर उद्योगाची खरी प्रगती होईल!
नांदेड जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी शेतकरीहिताचा निर्णय घेऊन ऊस उत्पादकांना ₹४०० अधिकचा भाव द्यावा, ही मनापासून अपेक्षा असल्याचे
शेतकरी संघर्ष समिती, हदगावचे
आत्माराम पाटील वाटेगावकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis