
बीड, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। शेतात इंडस टँक कंपनीच्या कामासाठी आणून ठेवलेल्या ६३० केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचे (डीपी) नटबोल्ट उघडून त्यातील चार कॉईल आणि १२०० लिटर ऑईल असा तब्बल ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातेफळ येथील मूळ रहिवासी व सध्या शिक्षक कॉलनी अंबाजोगाई येथे वास्तव्यास असलेले व्यावसायिक विकास दौलतराव किर्दत (वय ४४ वर्षे) यांनी सातेफळ शिवारातील शेत सर्व्हे नंबर ११८ मध्ये इंडस टँक कंपनीचे काम सुरू केले आहे. या कामासाठी त्यांनी एक महिन्यापूर्वी ट्रान्सफॉर्मर आणून शेतात ठेवला होता. काम संपवून ते अंबाजोगाई येथे निघून गेले.
दरम्यान त्यांच्या डीपीमधील साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. विकास किर्दत यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता ट्रान्सफॉर्मरचे नटबोल्ट खोलून साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. अज्ञात चोरट्यांनी ६ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार कॉईल आणि २ लाख ४० हजार रुपये किमतीचे १२०० लिटर ऑईल असा एकूण ८ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
या प्रकरणी विकास दौलतराव किर्दत यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जसवंत शेप करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis