मेळघाटातील चुरणी येथील पशुवैद्यकीय इमारत डॉक्टरांच्या प्रतीक्षेत
अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.) | मेळघाटातील चुरणी येथे पशुपालकांच्या सुविधेसाठी श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ही इमारत वापराविना पडून आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्य
पशुवैद्यकीय इमारत डॉक्टरांच्या प्रतीक्षेत


अमरावती, 22 ऑगस्ट (हिं.स.) | मेळघाटातील चुरणी येथे पशुपालकांच्या सुविधेसाठी श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने ही इमारत वापराविना पडून आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या इमारतीचा उपयोग नेमका कधी होणार, असा सवाल पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे.

चुरणी परिसरात गाय, म्हैस यांसह मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियमित सेवा आवश्यक असताना चुरणी येथे बराच काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनावर आजारी पडल्यास उपचारासाठी त्यांना दूरवरच्या ठिकाणी जावे लागते. वेळेत उपचार न मिळाल्यास जनावरांची प्रकृती गंभीर होण्याची भीती असून, दुर्गम व आदिवासी भागातील पशुपालकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. चुरणी येथे श्रेणी-२ पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, इमारत तयार असूनही नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने शासनाच्या निधीतून उभारलेली ही सुविधा प्रत्यक्षात पशुपालकांच्या सेवेत आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पशुधनाची नियमित तपासणी, लसीकरण, औषधोपचार तसेच आपत्कालीन पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे पशुपालक या मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande