बीड - स्थानिकांना रोजगार न देणाऱ्या 'आवादा' कंपनीविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा
बीड, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। तालुक्यातील मस्साजोग येथील ''आवादा पॉवर ऊर्जा प्रोजेक्ट''मध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या आणि कामे देण्याच्या अटीचा भंग केल्याप्रकरणी कंपनी आणि ग्रामस्थांमधील वाद आता उफाळून आला आहे. ग्रामपंचायतीने घातलेल
उपोषणाचा इशारा


बीड, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। तालुक्यातील मस्साजोग येथील 'आवादा पॉवर ऊर्जा प्रोजेक्ट'मध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकऱ्या आणि कामे देण्याच्या अटीचा भंग केल्याप्रकरणी कंपनी आणि ग्रामस्थांमधील वाद आता उफाळून आला आहे. ग्रामपंचायतीने घातलेल्या अटी व शर्तींचे पालन न झाल्याच्या निषेधार्थ मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी येत्या २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता थेट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा लेखी इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला सादर करण्यात आल्या आहेत.

मस्साजोग ग्रामपंचायत हद्दीत मागील तीन वर्षांपासून आवादा कंपनीचे गोडाऊन कार्यरत आहे. तत्कालीन सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कार्यकाळात कंपनीला गोडाऊनसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देताना स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याची मुख्य अट घालण्यात आली होती. मात्र, कंपनी प्रशासनाकडून या अटींची पूर्तता केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी गेल्या पाच महिन्यांत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनेकदा चर्चा करून स्थानिकांना काम देण्याची मागणी केली, परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत आवादा कंपनीला देण्यात आलेली ना-हरकत रद्द करून प्रकल्प कायमचा बंद करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आल्याचे सरपंचांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, या ठरावाच्या अधिकृत प्रतीबाबत विचारणा करण्यासाठी मस्साजोग ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गव्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच या संपूर्ण प्रकरणावर आवादा कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande