
रत्नागिरी, 22 ऑगस्ट (हिं.स.) । दहशतवादाशी संबंधित तक्रारी दाखल असल्याचे सांगत पोलिसांकडून अटक होण्याची भीती दाखवून रत्नागिरी शहरातील ६५ वर्षीय महिलेची ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १३ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शिवनेरी (तेलीआळी, रत्नागिरी) येथे ही घटना घडली. फिर्यादी मधुश्री विलास पुनसकर (वय ६५) यांच्याशी मोबाइलवरून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी आपली नावे नीरज कुमार आणि प्रदीप जयस्वाल अशी सांगितली. तसेच आपण ‘मिनिस्ट्री ऑफ इंडिया’मधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादीच्या आधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकाविरुद्ध दहशतवादाशी संबंधित अनेक तक्रारी दाखल असल्याचे सांगितले.
या प्रकरणामुळे पोलिसांकडून अटक होण्याची कारवाई होऊ शकते, अशी भीती संबंधितांनी फिर्यादीच्या मनात निर्माण केली. त्यानंतर या कथित प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी लागेल, तसेच फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या नावावरील ठेवी मनी लॉन्ड्रिंगमधून घेतल्या आहेत किंवा नाहीत, याची तपासणी करून संबंधित निधी पुन्हा परत करण्यात येईल, असा खोटा विश्वास देण्यात आला.
या प्रकारे फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेगवेगळ्या माध्यमातून ८७ लाख ४५ हजार ५४३ रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुनसकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.दहशतवाद, मनी लॉन्ड्रिंग, पोलिस कारवाई किंवा अटक यांसारख्या गंभीर बाबींची भीती दाखवून नागरिकांकडून पैसे उकळण्याच्या सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अशा फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून फोनवरून दबाव आणून आर्थिक रक्कम भरण्यास सांगितल्यास तातडीने संबंधित अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी