
पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)। चाकण-तळेगाव औद्योगिक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्क केलेल्या ५० हून अधिक अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, ही वाहने टो करून अन्यत्र हलविण्यात आली आहेत. तसेच संबंधित वाहनचालकांकडून चलनाची वसुली करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी ही माहिती दिली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कालपासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून, अनधिकृतपणे महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांविरोधात पुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रशासनाला काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात येत आहे.
चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यात मोठ्या संख्येने उद्योग आणि कंपन्या असल्याने दररोज हजारो कामगारांची ये-जा होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. महामार्गाच्या कडेला तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्याने वाहतुकीचा वेग मंदावून अनेक ठिकाणी कोंडी निर्माण होत आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनचालकांनी महामार्गावर अनधिकृतपणे वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. स्थानिक पातळीवरही वाहनचालक आणि संबंधित घटकांना याबाबत सूचना देण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त देशमुख यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु