
सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या आमदारांनी सोलापूर जिल्ह्यातील केम येथील कुंकू कारखान्यांची पाहणी केली. हिंगोलीचे विधान परिषद सदस्य हेमंत पाटील आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी कुंकू उत्पादकांशी संवाद साधून उद्योगासमोरील अडचणींची माहिती घेतली.
केम गावाला कुंकू उत्पादनाची ऐतिहासिक आणि पारंपरिक ओळख आहे. गावात सुमारे २५ कुंकू कारखाने असून, या उद्योगातून सुमारे ३०० ते ४०० नागरिकांना रोजगार मिळतो. मात्र, रस्त्यांची दुरवस्था, रेल्वेची बंद झालेली पार्सल सुविधा आणि गेल्या २६ वर्षांपासून प्रलंबित असलेली श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहत यामुळे उद्योगाच्या विकासाला अडथळे निर्माण होत असल्याचे कारखानदार आणि ग्रामस्थांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले.
केमला जोडणारे प्रमुख रस्ते सुधारावेत, श्री उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीच्या प्रकल्पाला गती द्यावी, इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, केम रेल्वे स्थानकावर अधिक गाड्यांना थांबा मिळावा आणि बंद झालेली रेल्वे पार्सल सुविधा पुन्हा सुरू करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या मागण्यांची दखल घेत आमदार हेमंत पाटील यांनी केमच्या उद्योग आणि विकासाशी संबंधित प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून देऊन आवश्यक सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केममध्ये उद्योगधंदे वाढून स्थानिकांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, ग्रामसेवक वैभव तळेकर यांच्यासह कुंकू कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड