
पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)। शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलने ही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठी संधी आहे. विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठी भाषेचा वापर आणि महत्त्व वाढविण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात येणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत संमेलनाच्या आयोजनासाठी विद्यापीठांचा सहभाग, विविध उपक्रम आणि नवकल्पनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी चंद्रकांत पाटील दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत प्रत्यक्ष उपस्थित होते. संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थी, नवोदित तसेच ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
उदय सामंत म्हणाले, “शंभरावे साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारे ठरावे. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वांनी मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया.”
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विद्यापीठांनी विद्यार्थी केंद्रित विविध साहित्यिक उपक्रम राबवावेत, असेही या बैठकीत आवाहन करण्यात आले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा मराठी साहित्याशी असलेला संवाद वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली.
बैठकीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, राजेश पांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्यासह विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु