सोलापूर स्मार्ट सिटीतील ३३१ सीसीटीव्ही दिवसा बंद; स्मार्ट सिग्नलही ठप्प
सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिटी योजनेतून बसविण्यात आलेले ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे दिवसा बंद राहत असल्याचे समोर आले आहे. स्ट्रीट लाईटच्या कनेक्शनवर हे कॅमेरे आणि शहरातील १० स्मार
Meter Smart


सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिटी योजनेतून बसविण्यात आलेले ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे दिवसा बंद राहत असल्याचे समोर आले आहे. स्ट्रीट लाईटच्या कनेक्शनवर हे कॅमेरे आणि शहरातील १० स्मार्ट सिग्नल जोडण्यात आले आहेत. महावितरणकडून दिवसा स्ट्रीट लाईट बंद केली जात असल्याने सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत सीसीटीव्ही आणि स्मार्ट सिग्नलही बंद राहत आहेत. धर्मवीर संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चार हुतात्मा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सात रस्ता आणि हरिभाई देवकरण प्रशाला परिसरासह शहरातील प्रमुख ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, दरोडा, खून तसेच अपघातांच्या तपासात पोलिसांना या कॅमेऱ्यांची मोठी मदत होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठीही सीसीटीव्हीचा वापर केला जातो. मात्र, कॅमेरे दिवसा बंद असल्याने गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना खासगी सीसीटीव्हीवर अवलंबून राहावे लागत आहे. अलीकडे भुसार पेठेतील चोरीच्या प्रकरणातही आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांना खासगी कॅमेऱ्यांची मदत घ्यावी लागली.

महावितरणच्या ऑटो प्रोग्रॅमिंगमुळे सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत स्ट्रीट लाईट आपोआप बंद होतात. स्ट्रीट लाईटच्या स्मार्ट मीटरवर सीसीटीव्ही आणि स्मार्ट सिग्नलचे कनेक्शन जोडण्यात आले असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. काही मीटरची वीजबिले थकीत असल्याचेही समोर आले आहे. या समस्येबाबत महापालिकेने महावितरणकडे पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप तोडगा निघालेला नाही.सोलापूर शहरात स्मार्ट सिटीचे ३३१ सीसीटीव्ही, रात्री बंद असणारे अंदाजे १७५ कॅमेरे आणि सुमारे दोन हजार २०० खासगी सीसीटीव्ही असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील कॅमेरे आणि सिग्नलची तांत्रिक अडचण तातडीने दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande