
पुणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नाव वगळलेल्या किंवा मतदार यादीत दुरुस्ती आवश्यक असलेल्या मतदारांना सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. सुनावणीच्या वेळी मतदारांनी मूळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक असून, संशयास्पद कागदपत्रांची संबंधित सरकारी विभागांमार्फत कडक पडताळणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी सहा समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र किंवा मंडळ अधिकारी कार्यालयात सुनावणीची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुनावणीचे ठिकाण मतदाराच्या घरापासून दोन किलोमीटरच्या परिघात असावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी केली.
सुनावणी प्रक्रियेसाठी सहा विशेष पथके कार्यरत राहणार आहेत. ही पथके सादर केलेले पुरावे तपासणे, २००२ च्या मतदार यादीतील नावाची पडताळणी करणे, नातेवाईकांशी मॅपिंग करणे आणि सुनावणीतील निर्णयाची प्रत ऑनलाइन अपलोड करण्याचे काम करतील.मतदारांनी सादर केलेली कागदपत्रे तसेच सुनावणीचा रोजनामा सुरक्षित ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डुडी यांनी प्रशासनाला दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु