
सोलापूर, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। सोलापुरातील प्रसिद्ध लेझीमला सर्वधर्मसमभावाची परंपरा लाभली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने शहरात लेझीमचे बहारदार खेळ रंगतात. याच परंपरेचा प्रत्यय थोरला मंगळवेढा तालीम येथे आला. राजकीय मतभेद बाजूला ठेवत विविध पक्षांचे नेते लेझीमच्या तालावर एकत्र आले.
विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर तसेच आमदार हेमंत पाटील यांच्या स्वागत आणि सत्काराचे आयोजन थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी धाराशिवचे आमदार कैलास पाटील आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचीही उपस्थिती होती.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिंदे गटाच्या आमदारांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेला प्राधान्य देणारे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
थोरला मंगळवेढा तालीमचे मार्गदर्शक आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवासाठी लेझीमची तयारी केली जाते. उत्सवाच्या सुमारे महिनाभर आधीपासून सरावाला सुरुवात होते. याच लेझीम पथकासोबत प्रताप चव्हाण यांनीही लेझीम खेळत उपस्थितांचा उत्साह वाढविला.
यानंतर उपस्थित आमदारांनीही हातात लेझीम घेत ताल धरला. राजकीय पक्ष आणि गटांच्या सीमा बाजूला ठेवून नेत्यांनी लेझीमच्या तालावर एकत्र येत सोलापूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेतला. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड