
सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)।
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असताना तक्रार निवारण यंत्रणा मात्र अपुरी असल्याचे चित्र आहे. एसटीच्या २४ तास सुरू असलेल्या टोल-फ्री कॉल सेंटरवर दररोज सुमारे ५०० ते ६०० तक्रारी आणि चौकशीचे कॉल येतात. मात्र, हे कॉल हाताळण्यासाठी केवळ पाच दूरध्वनी लाईन्स आणि १६ कर्मचारी कार्यरत आहेत.यापैकी एक दूरध्वनी लाईन सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत विद्यार्थिनींसाठी राखीव असते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रत्यक्षात चारच लाईन्स उपलब्ध राहतात. कर्मचारी पाळीपद्धतीने काम करत असल्याने उपलब्ध मनुष्यबळावरही ताण येत आहे.बस उशिरा येणे, मार्गात बस बंद पडणे किंवा प्रवासादरम्यान अन्य अडचणी निर्माण झाल्यास प्रवाशांना हेल्पलाईनवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा ३० ते ४५ मिनिटांपर्यंत कॉल सुरू राहत असल्याचे समोर आले आहे.प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत कॉल सेंटरमधील दूरध्वनी लाईन्स आणि कर्मचारी संख्या वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर आगारनिहाय संपर्क क्रमांक, डिजिटल तक्रार नोंदणी आणि कॉल-बॅकची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात आली आहेमोबाईलवरून तक्रार नोंदवता यावी, तक्रारीचा क्रमांक मिळावा आणि तिची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता यावी, अशी पर्यायी व्यवस्था उभारल्यास कॉल सेंटरवरील ताण कमी होऊ शकतो. एसटीच्या अधिकृत तक्रार निवारण प्रणालीवर ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा आणि १८०० २२ १२५० हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड