
सोलापूर, 22 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर शहरातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या स्थितीवर विधिमंडळ अंदाज समितीने नाराजी व्यक्त केली आहे. समितीने गणेश बिल्डर सोसायटी, होटगी रोडवरील सिमेंट रस्ते, विडी घरकुल वसाहत आणि बाळे परिसराची पाहणी केली. या पाहणीत शहरातील विविध भागांत घनकचरा आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याचे समितीच्या निदर्शनास आले. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी निधीची तरतूद असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी का झाली नाही, तसेच हा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल समितीने उपस्थित केला.
आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती मागवली.शहरात बांधकामांसाठी वाढीव एफएसआयला परवानगी दिली जात असताना संबंधित इमारतींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, हा प्रश्नही समितीने उपस्थित केला. तसेच महिला हॉस्पिटल ते साखर कारखाना या रस्त्याला पुढील पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीची मुदत असतानाही तेथे सिमेंट रस्ता करण्याच्या निर्णयाबाबत संबंधित विभागाकडून माहिती मागवण्यात आली.दरम्यान, समितीने सोलापूर महानगरपालिकेचे मागील पाच वर्षांचे कॅग लेखापरीक्षण अहवाल आणि मागील दोन वर्षांच्या अर्थसंकल्पाच्या प्रती मागवल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड