
ठाणे, 22 ऑगस्ट (हिं.स.)। शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनी ला ठाणे महानगर पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. असा कोणता साप आहे की ज्याच्या शेपटीवर आम्ही पाय दिला म्हणून परवानगी नाकारण्यात आली, असा सवाल करून ठाण्यात लोकशाहीचा मुडदा पाडला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच, मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचेही प्रधान यांनी सांगितले. यावेळी मा. नगरसेवक मिलींद बनकर, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, सचिन पंधरे उपस्थित होते.
खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरविण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आला आहे. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे मा. महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. तसेच, ठाणे महानगर पालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखविल्यासारखे झाले आहे, असा आरोप करीत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी क्लस्टर कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
पोलिसांच्या या भूमिकेवर मनोज प्रधान यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आपण मोर्चाच्या आयोजनाबाबत वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला माहिती देणारे पत्र दिले होते. त्यानंतर सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या सहीने नोटीस पाठवून 1 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश असल्याचे कळवून मोर्चाला परवानगी नाकारली. याचाच अर्थ वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून क्लस्टर कंपनीतून गोळीबार केला जात आहे, हेच अधोरेखित होत आहे. आमच्या मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या पोलीस निरीक्षक उत्तेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे जाहीर करावे, असे आवाहन प्रधान यांनी केली.
दरम्यान, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मूलभूत प्रश्नांना हात घालणार होतो. या शहरात 4 हजार एकरवर बांधकाम केले जाणार आहे. त्यांना 12.5 चा एफएसआय कोणत्या आधारावर दिला जात आहे? या बांधकामानंतर ठाण्यात किती घरांची निर्मिती होणार आहे? ठाण्यात किती लोक वास्तव्यास येतील? त्यांना पाणीपुरवठा कसा करणार? सांडपाणी आणि मलनिस्सारण याचे नियोजन कसे करणार? या प्रश्नांची उत्तरे देऊ लागू नयेत म्हणून मोर्चालाच परवानगी नाकारली जात आहे. एकंदर, तुम्हाला या शहराची विक्री करायची आहे अन् ठाणेकरांचा आवाज दाबायचा आहे. इतर राजकीय पक्षांनी नपुसंकासारखी तुमची भूमिका स्वीकारावी, असेच या लोकांना वाटत आहे. मात्र हे आम्हाला मान्य नसल्यानेच आम्ही सनदशीर मार्गाने आम्ही मोर्चा काढत होतो. मात्र, कंपनीने आपले सत्तेतील वजन वापरून हुकूमशाही पद्धतीने मोर्चाला परवानगी नाकारली . हा प्रकार लोकशाहीला मारक आहे. पोलिसांच्या मदतीने एखादी खासगी कंपनी लोकशाहीचा खून करीत आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष सहन करणार नाही, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर