
वर्धा, 23 ऑगस्ट (हिं.स.)। पुडुचेरी येथून कुरिअर पार्सल घेऊन हरियाण्याकडे निघालेला कंटेनर नियोजित वेळेत न पोहोचल्याने तब्बल १ कोटी ७१ लाख ५ हजार ४५३ रुपयांचे साहित्य गायब झाल्याचे पुढे आले आहे. हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आजंती परिसरात कंटेनरचे पत्रे कापून विविध कंपन्यांचे कुरिअर पार्सल चोरी करण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालक व क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या चोरीत विविध कंपन्यांचे सुमारे २५ प्रकारचे कुरिअर पार्सल गायब असल्याचे आढळले.
या प्रकरणी नवी दिल्ली येथील दिनेशकुमार बलबीरसिंग यादव यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांचा हरियाणातील बिलासपूर येथे शिवशक्ती ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या ट्रान्सपोर्टची वाहने देशभर मालवाहतुकीसाठी धावतात. १४ ऑगस्टच्या रात्री ट्रान्सपोर्टचा एचआर ५५ एयू १८७२ क्रमांकाचा कंटेनर ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड कंपनीची कुरिअर पार्सले घेऊन पुडुचेरीहून चेन्नई येथील गोदामाकडे रवाना झाला. कंटेनरवर चालक म्हणून राजस्थानातील तिजारा येथील सलीम खान सुभान खान, तर क्लिनर म्हणून हरियाणातील नागला येथील तालिम हबीब कार्यरत होते. चेन्नई येथील गोदामात पोहोचल्यानंतर काही कुरिअर पार्सल कंटेनरमध्ये भरून तो पटौदी, गुडगाव (हरियाणा) येथे जाण्यासाठी रवाना झाला. हैदराबादमार्गे वर्धा-बुटीबोरीकडे जात असताना १६ ऑगस्टच्या दुपारी कंटेनर महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ बराच वेळ उभा असल्याचे आढळले. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी चालक सलीम खान सुभान खान आणि क्लिनर तालिम हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासह चोरीला गेलेल्या मालाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
चालक- क्लिनरचे मोबाइल बंद
कंटेनर बराच वेळ एकाच ठिकाणी उभा असल्याची माहिती मिळताच ट्रान्सपोर्ट संचालकांनी चालक व क्लिनरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचेही मोबाइल बंद होते. त्यामुळे त्यांनी ब्लू डार्ट कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. कंपनीकडून पाठविण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाने पाहणी केली असता कंटेनरच्या कॅबिनच्या मागील बाजूचे पत्रे कापल्याचे निदर्शनास आले. त्यातून आतील कुरिअर पार्सल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी