लातूरमध्ये मटका-जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाने मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २
पोलीस कारवाई


लातूर, 23 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाने मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २६ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, ५२ हजार १३० रुपयांची रोकड, २६ मोबाईल, दोन चारचाकी, दहा दुचाकी आणि संगणक साहित्य असा एकूण १९ लाख ८ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात रवाना केले होते. या पथकाने मुरुड आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली.

मुरुडमध्ये जुगार अड्ड्यावर धाड

मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरुड बायपासवरील दत्त मंदिराच्या बाजूला असलेल्या रामेश्वर सवाशे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने तेथे छापा टाकून जुगार खेळणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ३१ हजार ७४० रुपयांची रोकड, १९ मोबाईल, दोन चारचाकी वाहने आणि दहा मोटारसायकली, असा एकूण १७ लाख ८१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात १९ जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९५/२०२६, महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब खोपे करीत आहेत.

दयानंद महाविद्यालयाजवळ मटका बुकीवर कारवाई

दुसरी कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. दयानंद महाविद्यालयाच्या गेटजवळ रस्त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मटका बुकीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने तेथे धाड टाकली. या कारवाईत २० हजार ३९० रुपयांची रोकड, ६० हजार रुपये किमतीचे सात मोबाईल आणि ४५ हजार ९०० रुपयांचे संगणक साहित्य, असा एकूण १ लाख २६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१९/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) तसेच महाराष्ट्र राज्य लॉटरी कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अनंत बुधोडकर करीत आहेत.

दोन कारवायांत १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण २६ आरोपींवर कारवाई केली. त्यांच्याकडून ५२ हजार १३० रुपयांची रोकड, २६ मोबाईल, दोन चारचाकी वाहने, दहा मोटारसायकली आणि संगणक साहित्य, असा एकूण १९ लाख ८ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande