
अमरावती, 23 ऑगस्ट (हिं.स.) मुख्याध्यापकाने सादर केलेल्या वैद्यकीय देयकाच्या प्रस्तावावर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी संशयित मुख्याध्यापक हारून शहा बाबा शहा (वय ५२, रा. पॅराडाईज कॉलनी, अमरावती) विरुद्ध फसवणूक, विश्वासघातप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले.
हारून शहा हे अंजुमन उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणी टाकळी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आईच्या आजाराचे ३८ हजार ८२५ रुपयांच्या एक वैद्यकीय देयकाचा प्रस्ताव सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या मार्फ माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्याकडे पाठविले होते. सदर देयकासह प्रस्तावाची तपासणी शिक्षणाधिकाऱ्यांनी केली असता, त्यावर अनेक ठिकाणी व्हाईटनर लावून खोडतोड केल्याचे दिसून येत होते. शिवाय सादर केलेल्या देयकावर प्रिया देशमुख यांची बनावट स्वाक्षरी केल्याची बाब तपासात पुढे आली.
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक हारून शहा यांचे देय पडताळणीकरीता वेतन विभागाकडे पाठविले असता, मुळे आदेश देयकवर सुद्धा खोडतोड केल्याचे दिसून आले. शिक्षणाधिकारी यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक हारून शहाविदरुद्ध फसवणूक, विश्वासघात, प्रकरणी गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुख्याध्यापकास मागितले स्पष्टीकरण यासंदर्भात झालेला घोळ लक्षात येताच माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी मुख्याध्यापक हारून शहा यांना स्पष्टीकरण मागितले होते. आदेशामध्ये शाळेचे व मुख्याध्यापकाचे नाव चुकीचे असल्यामुळे दुरुस्ती प्रस्तावाला विलंब होईल या भीतीमुळे शाळा, मुख्याध्यापकाचे नाव स्वत:च्या स्तरावर दुरुस्त केले. असे सांगून मुख्यापक यांनी क्षमा देखील मागितली होती. असे गाडगेनगर ठाण्यात दाखल पोलिस तक्रारीत नमुद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी