
रायगड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। : माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगाड येथील पायोनियर गॅस कंपनीमधून सुमारे एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा नालासोपारा पूर्व, जि. पालघर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर आरोपी कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या मुद्देमालासह पोलिसांना मिळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध कोलाड पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
न्यायालयाच्या परवानगीने सदर प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी माणगाव येथील पायोनियर गॅस कंपनीमधून सुमारे १ लाख रुपये किमतीचा माल चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सानप करीत आहेत. आरोपीकडून चोरीच्या इतर घटनांची माहिती मिळते का, तसेच आणखी काही मुद्देमाल चोरीला गेला आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)