

रायगड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। : रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, भोकरपाडा येथे अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक करून तब्बल १२ लाख रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, भोकरपाडा, पनवेल येथे राहतात. अज्ञात इसमाने फिर्यादींचा व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक केला. त्यानंतर फिर्यादी स्वतः अकाउंटंटला मेसेज करत असल्याचा भास निर्माण करून अकाउंटंटच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठविण्यात आला.
या संदेशाद्वारे एका बँक खात्यावर १२ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. फिर्यादींच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरूनच संदेश आल्याचा गैरसमज झाल्याने अकाउंटंटने सांगितलेल्या खात्यावर रक्कम वर्ग केली. त्यानंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४५/२०२६ अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००८ च्या सुधारणेसह) मधील कलम ६६(क), ६६(ड) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऑनलाइन फसवणुकीच्या या प्रकाराचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भुजबळ करीत असून, फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले खाते, मोबाईल क्रमांक आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे सोशल मीडिया अकाउंटची सुरक्षितता आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)