
बीड, 23 ऑगस्ट (हिं.स.)। ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या दीर्घकालीन योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. केज येथील साने गुरुजी निवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या कविता गित्ते-कराड यांची केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली असून, ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीमुळे बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात काम करताना केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याने हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला आहे. ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या या विद्यार्थ्यांना शाळेशी जोडून त्यांच्यातील क्षमता विकसित करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. शिक्षणासोबतच क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, विविध स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, खा. बजरंग सोनवणे आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या यशाबद्दल कौतुक केले आहे. बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळाचे अध्यक्ष उद्धव कराड आणि उपाध्यक्ष राजेश कापसे यांच्यासह सर्व सहकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून साने गुरुजी निवासी विद्यालय, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे शिक्षण आणि बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक चळवळीचा गौरव असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis