
रायगड, 24 ऑगस्ट (हिं.स.)।रायगड-अलिबाग : राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’चे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांनी केले आहे.
यावर्षी या स्पर्धेचा विस्तार राज्यस्तरासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध स्तरांवर आपली वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि उपक्रम सादर करून पारितोषिके जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्पर्धेसाठी अर्ज ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार असून, नोंदणीची अंतिम तारीख ७ सप्टेंबर २०२६ आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, केवळ नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच सहभाग घेता येणार आहे.
ही स्पर्धा राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीन स्तरांवर होणार असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या मंडळांचा गौरव करण्यात येणार आहे.
याशिवाय, पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घरगुती व सार्वजनिक गणपती तसेच विविध प्रसिद्ध गणेश मंदिरांतील गणेशमूर्तींचे लाईव्ह दर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना आपल्या घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रेही या पोर्टलवर विनामूल्य प्रसिद्ध करता येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक गणेशोत्सव मंडळे आणि कुटुंबांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)