
यवतमाळ, २४ ऑगस्ट (हिं.स.) : शासनाने तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रशस्त इमारतीत मात्र मनुष्यबळाअभावी आरोग्यसेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. डॉक्टर, आरोग्य सहायक, परिचर, सफाई कामगार आणि एएनएमची अनेक पदे रिक्त असल्याने परिसरातील हजारो नागरिकांना आरोग्यसेवेसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीकडे संबंधित लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून त्यांच्यात संतापाची भावना आहे.
पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरचे पद रिक्त आहे. सध्या दोन महिला डॉक्टर कार्यरत असून त्यापैकी एक डॉक्टर कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहे. आरोग्य सहायकाचे एक पदही रिक्त आहे. परिचराची चार पदे मंजूर असताना चारही पदे रिक्त आहेत. त्यामुळे जखमी रुग्णांना साधी पट्टी बांधण्यासाठीही पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.
सफाई कामगाराचे पदही रिक्त
आरोग्य केंद्रात सफाई कामगाराचे एक पद असून तेही रिक्त आहे. परिणामी नव्या इमारतीत अनेक ठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो. इमारतीच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. पावसाळ्यात या परिसरात साप, विंचू यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला असून एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
एएनएमची सहा पदे रिक्त
पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एएनएमची नऊ पदे असून त्यापैकी तब्बल सहा पदे रिक्त आहेत. या केंद्राच्या अखत्यारित आठ उपकेंद्रे येतात. त्यापैकी सहा उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी पदे रिक्त आहेत. त्यामुळे या सर्व उपकेंद्रांमधील रुग्ण थेट पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असल्याने येथील आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे.
दररोज २०० ते २५० रुग्णांची ओपीडी
पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३० ते ४० गावांचा समावेश आहे. त्यामुळे दररोज ओपीडीमध्ये तब्बल २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र उपलब्ध मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णांची गैरसोय अधिकच वाढते.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी