
जळगाव, २४ ऑगस्ट (हिं.स.) : अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेण्यात आली.
बैठकीत जुलै २०२६ मध्ये नव्याने दाखल झालेले तसेच पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच जुलै २०२६ अखेर पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांवरही चर्चा करण्यात आली.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्यांतील पीडित व्यक्तींना शासनाच्या नियमानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगानेही आढावा घेण्यात आला.
याशिवाय तृतीयपंथीय व्यक्तींसाठीच्या विविध योजना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस उपस्थित करण्यात आलेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.
संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती
समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर