
परभणी, 24 ऑगस्ट (हिं.स.)।
कृषी विभागाच्या प्रस्तावित अतांत्रिक आकृतीबंधाला तीव्र विरोध दर्शवत, तो पूर्णपणे रद्द करून शेतकरी-केंद्रित व सक्षम नवीन आकृतीबंध तयार करण्याच्या मागणीसाठी पालम तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी काळी फीत लावून तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले.निवेदनानुसार, महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेने याआधीच शासनाकडे या आकृतीबंधाबाबत औपचारिक विरोध नोंदवला होता, मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. वृत्तमाध्यमांच्या वृत्तांनुसार सध्याच्या आकृतीबंधात केवळ किरकोळ बदल करून तोच कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते, जे दीर्घकालीन दृष्टीने अपुरे व भविष्यात प्रशासकीय अडचणी निर्माण करणारे ठरू शकते.संघटनेने, प्रस्तावित आकृतीबंध तात्काळ स्थगित करावा, नवीन तज्ज्ञ समिती गठित करावी, नव्या समितीने शेतकरी हिताचा आकृतीबंध तयार करावा, आदी मागण्या केल्या आहेत. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अभयकुमार हनवते, सचिव मुंजाभाऊ दुधाटे, उपाध्यक्ष वसंत राठोड, कार्याध्यक्ष अमोल खरटमोल, तालुका संघटक अशा किंगरे यांच्यासह इतर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis