
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगरातील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर विद्यार्थी सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभासाठी आले होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील कथित गैरप्रकार, गुंडगिरी तसेच विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची माहिती अमित ठाकरे यांना दिली. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर अमित ठाकरे यांनी थेट महाविद्यालयाचे प्राचार्य संजीव रेड्डी यांची भेट घेतली. विद्यार्थिनींच्या गैरसोयी आणि इतर समस्या तातडीने सोडवण्याची मागणी त्यांनी केली. तसेच, या समस्या पुढील २४ तासांत सोडवाव्यात अन्यथा मनसे विद्यार्थी सेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा अमित ठाकरे यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis