महिला उद्योजकतेला बळ; धाराशिव जिल्हा परिषदेचा राज्यातील पहिला अभिनव प्रयोग
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। प्रत्येक मंजूर कर्जप्रकरणामागे ‘उमेद’च्या सीआरपींना मिळणार ₹१ हजार प्रोत्साहन; ७३४ गावांतून ३५०० महिला उद्योजक घडविण्याचे लक्ष्य ग्रामीण भागातील महिलांना केवळ बचत गटांच्या चौकटीत न ठेवता त्यांना उद्योग-व्यवसा
महिला उद्योजकतेला बळ; धाराशिव जिल्हा परिषदेचा राज्यातील पहिला अभिनव प्रयोग


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

प्रत्येक मंजूर कर्जप्रकरणामागे ‘उमेद’च्या सीआरपींना मिळणार ₹१ हजार प्रोत्साहन; ७३४ गावांतून ३५०० महिला उद्योजक घडविण्याचे लक्ष्य

ग्रामीण भागातील महिलांना केवळ बचत गटांच्या चौकटीत न ठेवता त्यांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. प्रत्येक मंजूर कर्जप्रकरणासाठी उमेद अभियानातील समुदाय संसाधन व्यक्तींना (सीआरपी) एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम जिल्हा परिषद राबविणार आहे. जिल्ह्यातील ७३४ गावांमधून किमान चार ते पाच महिला उद्योजक घडवून तब्बल ३५०० महिला उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महिलांना उद्योगासाठी कर्ज मिळवून देणे, कर्जप्रकरणांची पूर्तता करणे आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात सीआरपींची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि अधिकाधिक महिला उद्योजकतेकडे वळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक यशस्वी कर्जप्रकरणामागे एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

१.४६ लाख महिलांचा सहभाग

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ३८४ स्वयंसहाय्यता गट स्थापन झाले असून, त्यात तब्बल १ लाख ४६ हजार ११९ महिला सहभागी आहेत. याशिवाय ७७८ ग्रामसंघ, ५५ प्रभागसंघ, ५१४ उत्पादक गट आणि महिलांच्या नऊ शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत.

जिल्ह्यात सुमारे १२०० समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत असून, महिला बचत गटांची स्थापना, बचतीला प्रोत्साहन, कर्जप्रक्रियेसाठी मदत आणि व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन अशी विविध कामे त्यांच्या माध्यमातून केली जातात.

‘लखपती दीदीं’नंतर ‘करोडपती दीदी’चे लक्ष्य

स्वयंसहाय्यता गटातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात सुमारे १ लाख १९ हजार महिला ‘लखपती दीदी’ झाल्याची माहिती देण्यात आली. आता या महिलांना पुढील टप्प्यात मोठ्या उद्योग-व्यवसायांकडे वळवून ‘करोडपती दीदी’ घडविण्याचा मानस आहे.

CMEGP, PMEGPच्या माध्यमातून कर्जसुविधा

महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या योजनांचा आधार घेतला जाणार आहे. प्रत्येक गावातून किमान चार ते पाच महिला उद्योजक तयार करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून कर्जप्रकरणे पुढे नेली जाणार आहेत.

कर्जप्रकरणांना गती देताना सीआरपींना मिळणारे प्रोत्साहन त्यांच्या कार्यक्षमतेला चालना देईल. परिणामी अधिकाधिक महिलांना उद्योग उभारणीसाठी कर्ज, मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande