जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालय आग : यशोमती ठाकुरांनी व्यक्त केला तीव्र रोष, घटनास्थळाची केली पाहणी
अमरावती, 24 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालक दगावले. या घटनेमुळे अमरावतीत खळबळ उडाली असताना राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुरांनी शासनाच्या धोरणाविरोधात व्यक्त केला तीव्र रोष घटनास्थळाची केली पाहणी


अमरावती, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालक दगावले. या घटनेमुळे अमरावतीत खळबळ उडाली असताना राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

तीन वर्षांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयातील जुन्या इमारतीत असणाऱ्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागली होती. त्या घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता विभाग नव्या इमारतीत हलवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. दीड वर्षांपूर्वी रुग्णालयाच्या नव्या इमारतीत हे नवजात शिशु अतिदक्षता विभाग हलवण्यात आले. इमारत सर्व सोयींनी अद्यावत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळताच यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

या ठिकाणी इन्व्हर्टरमध्ये झालेला ब्लास्ट आणि त्यानंतर आग विझवण्यासाठी अद्यावत यंत्रणा जिल्हा स्त्री रुग्णालयात उपलब्ध नसल्याबाबत यशोमती ठाकूर यांनी रोष व्यक्त केला. हे सरकार कारण नसणाऱ्या विषयांवर लक्ष केंद्रित करतंय, हे योग्य नाही. सर्वसामान्य लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. त्यांना त्रास होऊ नये यासाठी खरंतर शासनाने लक्ष द्यायला हवं, असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.

केवळ श्रीमंतांसाठीच हे सरकार नाही तर सर्वसामान्य गरिबांच्या प्रश्नांना देखील या शासनाने महत्त्व द्यायला हवं. मात्र, दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. याबाबत देखील यशोमती ठाकूर यांनी खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री स्वतःला इन्फ्रामॅन म्हणत आहेत. मात्र, खरोखरच राज्यात योग्य इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करून योग्य नियोजन करावं, असं देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. या घटनेत परिचारिकांनी नऊपैकी सहा बाळांचा जीव वाचवला. मात्र, आता कारवाई त्यांच्यावरच होणार. खरंतर असं न होता मुळात या सर्व व्यवस्थेसाठी दोषी कोण आहे? हे निश्चित करून कारवाई व्हावी, अशी मागणी देखील यशोमती ठाकूर यांनी केली.

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश : बावनकुळे

अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी आहे. दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो. या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात आहे. मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पोलीस आयुक्तांनी केली पाहणी

अमरावतीचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली. या आगीमागचं नेमकं कारण काय? याची चौकशी केली जाईल, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande