टीबीमुक्तीच्या लढ्याला ग्रामपंचायतींचे बळ; धाराशिव तालुक्यात ६८ ग्रामपंचायतींचा गौरव
छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। ६० ग्रामपंचायतींना रौप्य, ८ ग्रामपंचायतींना कांस्य पदक; ५ सुवर्णपदक विजेत्यांचा जिल्हास्तरावर सन्मान धाराशिव तालुक्यात क्षयरोग निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यासाठी ‘टीबी मुक्
अ


छत्रपती संभाजीनगर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

६० ग्रामपंचायतींना रौप्य, ८ ग्रामपंचायतींना कांस्य पदक; ५ सुवर्णपदक विजेत्यांचा जिल्हास्तरावर सन्मान

धाराशिव तालुक्यात क्षयरोग निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यासाठी ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत गुणगौरव सोहळा – 2025’ परिचर्या प्रशिक्षण केंद्र, धाराशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात रौप्य पदक विजेत्या 60 ग्रामपंचायती आणि कांस्य पदक विजेत्या 8 ग्रामपंचायतींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर सुवर्णपदक विजेत्या 5 ग्रामपंचायतींचा सन्मान जिल्हास्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्षयरोग केंद्र, धाराशिवचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमजान अली शेख उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्व विजेत्या ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा रौप्य अथवा कांस्य पुतळा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायतींनी क्षयरोग निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले आणि भविष्यातही टीबी निर्मूलनाच्या अभियानात अधिक जोमाने सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. रमजान अली शेख यांनी क्षयरोगाचे संपूर्ण उच्चाटन ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन धाराशिव तालुका टीबीमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद गिरी यांनी धाराशिव तालुक्यातील क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची सद्यस्थिती, आतापर्यंतची उपलब्धी आणि पुढील उद्दिष्टे याबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामपंचायती आणि आरोग्य विभाग यांच्यात अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण समन्वय राहिल्यास क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट अधिक वेगाने साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागातून तालुक्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींना ‘गोल्ड मेडल’ मिळवून देण्यासाठी आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांनी एकत्रितपणे काम केल्यास धाराशिव तालुका टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.

श्रीमती संध्या द्वासे यांनी ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ अभियानातील सहा प्रमुख निर्देशांकांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेऊन क्षयरोग निर्मूलनाच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande