
अमरावती, 24 ऑगस्ट (हिं.स.)राखी पौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर आल्याने अमरावती शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये राख्यांच्या खरेदीची लगबग वाढली आहे. गांधी चौक, अंबादेवी रस्ता, बापट चौक, चित्रा चौक, इतवारा बाजार, जवाहर गेट रोड, गाडगेनगर आणि मोची गल्ली परिसरात आकर्षक राख्यांचे स्टॉल सजले असून, सणाच्या पार्श्वभूमीवर महिला व मुलींची गर्दी वाढताना दिसत आहे.
यंदा पारंपरिक राख्यांसोबतच फॅन्सी राख्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. कलकत्ता फॅन्सी, स्टोन, मोती, कुंदन, रुद्राक्ष तसेच चांदीसदृश राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. आकर्षक डिझाईन आणि विविध प्रकारांमुळे ग्राहकांसमोर निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. लहान मुलांसाठी कार्टून पात्रांच्या राख्याही बाजारात लक्ष वेधून घेत आहेत.
मात्र, यंदा राख्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. राखी तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, मजुरी आणि वाहतूक खर्चामुळे राख्या गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरवाढ झाली असली तरी सणाचा उत्साह कायम असून, ग्राहक आपल्या बजेटनुसार राख्यांची खरेदी करत आहेत. बाजारात साध्या आणि कमी किमतीच्या राख्यांपासून आकर्षक, डिझायनर आणि महागड्या राख्यांपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार राखीच्या स्वरूपातही बदल होताना दिसत आहे. केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरती मर्यादित असलेली राखी आता महिलांमध्येही लोकप्रिय होत आहे. महिला एकमेकींना राखी बांधत असल्याने त्यांच्यासाठी खास मोती, स्टोन, कुंदन आणि ब्रेसलेट प्रकारातील राख्यांना चांगली मागणी आहे. राखी पौर्णिमा जसजशी जवळ येईल, तसतशी बाजारपेठांमधील गर्दी शहरातील आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राख्यांच्या खरेदीला अधिक वेग येण्याची अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.
बाजारात उपलब्ध राख्यांचे प्रकार
कलकत्ता फॅन्सी राख्या
स्टोन, मोती आणि कुंदन राख्या
रुद्राक्ष व चांदीसदृश राख्या
लहान मुलांसाठी कार्टून राख्या
महिलांसाठी ब्रेसलेट प्रकारातील राख्या------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी