
लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।
:येत्या २६ ऑगस्ट रोजी मुस्लिम समाजाचा पवित्र सण 'ईद-ए-मिलाद' उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अहमदपूर शहरात सकल मुस्लिम समाजाच्या वतीने एका भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी ही मोटरसायकल रॅली अधिकृतपणे रद्द केली आहे.
शहरात शांतता आणि सलोखा कायम राहावा, लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी दि २४ ऑगस्ट रोजी अहमदपूर पोलीस ठाण्यात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. अहमदपूर पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या बैठकीत पोलीस प्रशासनाने सकल मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळा सोबत सविस्तर चर्चा केली.
पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मांडलेल्या भूमिकेचा व आवाहनाचा मुस्लिम बांधवांनी आदर केला. शहरात सर्वधर्मसंभाव टिकून राहावा आणि कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी समाजाच्या वतीने २६ ऑगस्ट रोजी निघणारी मोटरसायकल रॅली रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या या समन्वयाच्या भूमिकेचे व मुस्लिम समाजाच्या संयमी निर्णयाचे शहरातून स्वागत होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis