
लातूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील उद्योगांची संख्या आणि गुंतवणूक सातत्याने वाढत असून त्याद्वारे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. जिल्ह्यात उद्योगांची उभारणी होत असून अनेक तरुण नवनवीन संकल्पना घेऊन उद्योग क्षेत्रात पदार्पण करत आहेत. अशा नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदतीसाठी मैत्री कक्ष आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केले जाईल. तसेच उद्योगांसाठी आवश्यक परवानगी देण्यात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिली. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि नवउद्योजकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जुनी एमआयडीसी येथील 'एनरायज बाय सयाजी हॉटेल' येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
लातूर जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये सुमारे ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात उद्योग व निर्यात क्षेत्रात लातूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून, कृषी आधारित उद्योगांमध्ये सोयाबीन आणि डाळ उद्योगाने अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. याशिवाय बेलकुंड एमआयडीसी आणि लातूर विस्तारीत एमआयडीसीमध्ये लवकरच नवीन भूखंड उपलब्ध करून दिले जाणार असून, लातूर शहर द्रुतगती महामार्गाने जोडले जात असल्याने उद्योजकांना याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्र शासन आणि जिल्ह्यातील नवउद्योजकांमध्ये ९२ सामंजस्य करार करण्यात येऊन एमओयू वितरीत करण्यात आले. यामाध्यमातून ३ हजार ६६ कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून सुमारे ४ हजार १६९ जणांना रोजगार उपलब्ध होईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) निखिल पाटील यांनी केले. ते म्हणाले, लातूरमधील औद्योगिक क्षमता आणि येऊ घातलेली नवीन गुंतवणूक यांची योग्य सांगड घालण्यासाठी ही गुंतवणूक परिषद अत्यंत उपयुक्त ठरेल. जिल्ह्यातील उद्योगांच्या संधी ओळखून गुंतवणूकदारांना आकर्षित करणे आणि मैत्री कक्षासारख्या उपक्रमांतून आवश्यक परवानग्या गतीने देणे हे प्रशासनाचे मुख्य ध्येय असून, उद्योजकांना लागणारा सर्व आवश्यक समन्वय जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून केला जाईल. याप्रसंगी मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर आवटी यांनी मैत्री पोर्टल आणि उद्योगविषयक विविध परवानग्यांच्या प्रक्रियेबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis