
अस्वच्छतेचा कळस, परवाना नसल्याने कारखाना सील
तुटलेल्या भिंती, जळालेल्या टिनशेडमध्ये लाडू निर्मिती
शहरातील विविध स्वीट मार्टमध्ये होत होता पुरवठा
अमरावती, २४ ऑगस्ट (हिं.स.) । शहरातील विविध स्वीट मार्टमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येणाऱ्या मोतीचूर लाडूंच्या निर्मितीमागील धक्कादायक अस्वच्छता अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत उघडकीस आली आहे. रामपुरी कॅम्प परिसरातील पिंट्ट यादव यांच्या मालकीच्या लाडू निर्मिती कारखान्यावर एफडीएच्या पथकाने धाड टाकून गंभीर अनियमितता उघड केली. अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना या प्रतिष्ठानाकडे नसल्याचे तपासणीत समोर आले. त्यानंतर प्रशासनाने कारखान्याचे कामकाज बंद करून प्रतिष्ठानाला सील ठोकले.
एफडीेएच्या पथकाला लाडू तयार होणाऱ्या परिसरात अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. तुटलेल्या भिंती आणि जळालेल्या टिनशेडमध्ये खाद्यपदार्थांची निर्मिती सुरू होती. परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार पडून असल्याचेही निदर्शनास आले. अशा अस्वच्छ वातावरणात तयार होणारे मोतीचूर लाडू शहरातील विविध स्वीट मार्टमध्ये ग्राहकांच्या विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे तपासणीत समोर आले.
लाडूंवर आवश्यक लेबलिंगच नाही
या कारखान्यात तयार करण्यात येणाऱ्या लाडूंवर आवश्यक असलेले लेबलिंगही करण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. अन्नपदार्थांची निर्मिती व विक्री करताना भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नियमांचे पालन करणे आवश्यक असताना येथे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
ऑर्डरनुसार मोठ्या प्रमाणात मोतीचूर लाडू तयार करून शहरातील विविध स्वीट मार्टमध्ये त्यांचा पुरवठा केला जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मूलभूत स्वच्छता नियमांची पायमल्ली करून तयार केलेले खाद्यपदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत असल्याने या कारवाईनंतर संबंधित लाडूंच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
परवाना नसल्याने कारवाई
एफडीएचे सहायक आयुक्त विनय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपुरी कॅम्प परिसरातील या प्रतिष्ठानाची तपासणी केली असता कोणताही वैध अन्न व्यवसाय परवाना आढळून आला नाही. याशिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याने तेथील कामकाज तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
शहरभर मोतीचूर लाडूंचा पुरवठा करणाऱ्या या कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे खाद्यपदार्थांच्या निर्मितीतील स्वच्छता आणि परवाना व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील इतर खाद्यपदार्थ निर्मिती केंद्रांचीही तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी