दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तने त्रंबकेश्वर-नाशिकमध्ये भाविकांची मोठी गर्दी
- गोदा किनारी पूजा विधी - स्नान संपन्न त्र्यंबकेश्वर, 24 ऑगस्ट (हिं.स.)। पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आज (दि.२४ ऑगस्ट) रोजी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्
दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तने त्रंबकेश्वर-नाशिकमध्ये भाविकांची मोठी गर्दी


- गोदा किनारी पूजा विधी - स्नान संपन्न

त्र्यंबकेश्वर, 24 ऑगस्ट (हिं.स.)।

पवित्र श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आज (दि.२४ ऑगस्ट) रोजी १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दरम्यान दक्षिणेची काशी असलेल्या गोदावरी किनारी अनेक पूजा विधी तसेच स्नान भाविकांकडून करण्यात आले राज्याच्या देशाच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी दाखल झालेले होते.

दुसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे भगवान त्र्यंबकेश्वराची विशेष महापूजा व अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय आहे.भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन रांगेचे विशेष नियोजन केले असून, पूर्व दरवाजा व इतर मार्गांवरून भाविकांना प्रवेश दिला जात आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठिकठिकाणी पोलीस आणि होमगार्ड यांचा तगडा फौजफाटा आहे. याशिवाय फेरीच्या मार्गावर जागोजागी आरोग्य पथक असून, डॉक्टरांकडून भाविकांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान नाशिक शहरातील कपालेश्वर, नारो शंकरासह विविध मंदिरामध्ये भाविकांनी श्रावणी सोमवार यानिमित्त मोठी गर्दी केलेली होती. तसेच श्रावणी सोमवार निमित्य दक्षिणेची काशी असलेल्या गोदावरी नदीत अंघोळ करून अनेक भाविकांनी श्री शंकराचे दर्शन घेतले तसेच पूजा विधीचा कार्यक्रम देखील रामकुंडा वरती केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande