जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्तेसाठी राजकीय हालचालींना वेग
शिंदेसेना, भाजप आणि काँग्रेसच्या बैठकांना जोर आघाडी-युतीच्या गणितांवर पडद्यामागे खलबते यवतमाळ, २४ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेची खुर्ची डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अंति
‘मध्यवर्ती’च्या सत्तेसाठी पडद्यामागे ‘ऑपरेशन’!


शिंदेसेना, भाजप आणि काँग्रेसच्या बैठकांना जोर

आघाडी-युतीच्या गणितांवर पडद्यामागे खलबते

यवतमाळ, २४ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेची खुर्ची डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अंतिम मतदार यादी १९ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीपूर्वीच आघाडी आणि युतीची गणिते जुळविण्यासाठी पडद्यामागील खलबते सुरू झाली आहेत. शिंदेसेना, भाजप आणि काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, ‘कुणासोबत जायचे आणि कुणाला दूर ठेवायचे?’ याची चाचपणी सुरू आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका गटातील १६ आणि जिल्हा गटातील ९ अशा एकूण २५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बँकेवरील सत्ता कायम ठेवण्यासोबतच प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी प्रमुख पक्षांनी आतापासूनच राजकीय ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

शिंदेसेना-भाजपच्या बैठका

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेसेनेकडून आतापर्यंत भाजपसोबत दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. संभाव्य युती, जागावाटप आणि तालुकानिहाय राजकीय ताकदीचे गणित यावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, कोणाला किती जागा आणि कोणत्या जागा द्यायच्या, याचा पेच अद्याप कायम आहे.

काँग्रेसचीही रणनीती

काँग्रेसनेही दोन बैठका घेतल्या आहेत. जिल्हा बँकेचे भावी अध्यक्ष म्हणून स्वतःला पुढे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांनी भाजपसोबत संवाद साधल्याची चर्चा आहे. शिंदेसेनेशीही काँग्रेसचा संवाद सुरू असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसची नेमकी रणनीती काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एका बाजूला शिंदेसेना-भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची संभाव्य युती आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची विविध राजकीय घटकांशी सुरू असलेली चर्चा, यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आता केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता जिल्ह्यातील राजकीय शक्तिपरीक्षेचे मैदान बनण्याची चिन्हे आहेत.

जागावाटपाचा ‘बिग बॉस’ कोण?

आघाडी किंवा युती झाली तरी खरी परीक्षा जागावाटपाचीच असणार आहे. तालुकानिहाय प्रभाव, मतदारसंघातील गटबाजी, सहकार क्षेत्रातील वजन आणि स्थानिक नेत्यांची ताकद लक्षात घेऊन उमेदवारी निश्चित करावी लागणार आहे. त्यामुळे संभाव्य आघाड्यांमध्ये जागावाटपावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुणाच्या गळ्यात कुणाचा गळा?

सत्तेच्या समीकरणासाठी सध्या बैठका, भेटीगाठी आणि पडद्यामागील चर्चांना वेग आला आहे. कोणता पक्ष कोणाच्या गळ्यात गळा घालतो आणि कुणाला राजकीय धक्का देतो, याचे चित्र निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अधिक स्पष्ट होणार आहे.

अंतिम मतदार यादी जाहीर झाल्याने आता निवडणूक कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असून इच्छुकांची धावपळही वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande