महाड येथील ‘अमृतपेठ’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड, 24 ऑगस्ट (हिं.स.)। : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृतपेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ या उपक्रमाला महाड येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री वीरेश्वर मंदिर सभागृहात 21 त
महाड येथील ‘अमृतपेठ’ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


रायगड, 24 ऑगस्ट (हिं.स.)। : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृतपेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ या उपक्रमाला महाड येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री वीरेश्वर मंदिर सभागृहात 21 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत भरविण्यात आलेल्या या बाजारपेठेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील नवउद्योजकांनी सहभाग घेत आपल्या उत्पादनांची थेट विक्री केली.

या बाजारपेठेचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे शरददादा गांगल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक शिवराजजी भागवत, नगरसेवक अॅड. सनी जाधव, विद्याताई देसाई, ममता मेहता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनानंतर मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देत उद्योजकांशी संवाद साधला व त्यांच्या उत्पादनांची खरेदी करून प्रोत्साहन दिले.

बाजारपेठेत घरगुती पिठे, मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, हस्तकला वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, विणकाम साहित्य, महिलांनी तयार केलेल्या आकर्षक पर्स तसेच सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे आदी विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. स्थानिक उद्योजकांच्या दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांना ग्राहकांनी मोठी पसंती दिली.

‘एक दिवस राष्ट्रासाठी’ या संकल्पनेअंतर्गत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. जनकल्याण रक्त केंद्राच्या सहकार्याने पार पडलेल्या या उपक्रमात उद्योजिका आणि ग्राहकांनी उत्स्फूर्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तसेच महिला व पुरुषांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉचे विशेष आकर्षण ठरले. वामन हरी पेठे ज्वेलर्स, माणगाव यांच्या सहकार्याने विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार आणि स्थानिक लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘अमृत’तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या बाजारपेठेला महाड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली. ग्राहकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद नवउद्योजकांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरला. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने सुरू झालेल्या या उपक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्यगीताने झाली. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे, उपव्यवस्थापक मंगेश ढेबे, अमृतसखी जान्हवी साठे तसेच विक्रांत बुटाला व केदार पुरोहित यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande