यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषेच्या अभ्यासातील एक दुवा निखळला - राज ठाकरे
मुंबई, 24 ऑगस्ट (हिं.स.)। ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा आणि व्याकरणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यास्मिन शेख यांना
Dr. Yasmin Shaikh


मुंबई, 24 ऑगस्ट (हिं.स.)। ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा आणि व्याकरणाच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा आणि मराठी भाषेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव केला.

जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रुबेन यांनी अझीझ शेख यांच्याशी विवाह केल्यानंतर त्या यास्मिन शेख झाल्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या आणि मुस्लिम व्यक्तीशी संसार केलेल्या यास्मिनबाईंनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी भाषेच्या अभ्यासासाठी, व्याकरणासाठी आणि प्रमाणभाषेच्या जतनासाठी वाहून घेतले. भाषा आणि महाराष्ट्राशी असलेली त्यांची निष्ठा ही जन्मावर नव्हे, तर आपल्या आचरणातून मराठीपण कसे कमावता येते, याचे उदाहरण असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

यास्मिनबाईंच्या कार्याचा उल्लेख करताना राज ठाकरे यांनी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून एका संस्कृतीची स्मृती असल्याचे नमूद केले. शुद्ध लेखन, योग्य उच्चार आणि व्याकरणाचे नियम पाळण्याची शिस्त त्यांच्या पिढीत होती. आज संवादाची साधने मोठ्या प्रमाणावर वाढली असून प्रत्येकाच्या हातात लिहिण्याचे माध्यम आले आहे; मात्र भाषेबद्दलचा काटेकोरपणा कमी होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

भाषेत काळानुसार नवे शब्द आणि नवे प्रवाह येणे स्वाभाविक आहे, यास्मिनबाईंचाही त्याला विरोध नव्हता. मात्र बदल विचारपूर्वक व्हावा, भाषेची मूळ रचना आणि बाज टिकून राहावी, असा त्यांचा आग्रह होता. बोलीभाषा समृद्ध होत असतानाच प्रमाणभाषाही टिकली पाहिजे आणि मराठी मातृभाषिकांना ती उत्तम बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता.

प्रमाणभाषेचा आग्रह हा भाषेच्या शुद्धतेचा अट्टहास नसून भाषेच्या अभिव्यक्तीची ताकद टिकवण्याचा प्रयत्न आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यास्मिन शेख यांच्या निधनाने केवळ एक व्याकरणतज्ज्ञ हरपल्या नसून भाषेवर प्रेम करणे म्हणजे तिच्याशी काटेकोर राहणे, असे मानणाऱ्या एका पिढीतील आणखी एक महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande