
नंदुरबार, 24 ऑगस्ट (हिं.स.) | सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावातील बारीपाडा येथे आजारी पडलेल्या २३ वर्षीय विवाहित महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
रस्ता आणि नदीवरील पूल नसल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी बांबू आणि चादरीच्या मदतीने झोळी तयार करून महिलेला रुग्णालयाकडे नेण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. रुसाबाई सुभाष वळवी यांना अचानक छातीत आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृती बिघडत गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी पिंपळखुंटा येथील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने तसेच नदीवर पूल किंवा फरशी नसल्याने रुग्णवाहिकेची सुविधा मिळणे शक्य झाले नाही. त्यातच परिसरात मोबाईल नेटवर्कची अडचण असल्याने रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्यातही अडथळा आला. अखेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू व चादरीच्या साहाय्याने झोळी तयार करून रुसाबाई यांना पायी रुग्णालयाकडे नेण्यास सुरुवात केली. रस्ता आणि नदी पार करताना बराच वेळ गेल्याने रुसाबाई यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
रुसाबाई यांचे माहेर वेहगी बारीपाडा असून सासर ओहवा येथे आहे. दोन दिवसांपूर्वीच त्या पतीसोबत माहेरी आल्या होत्या. त्यांना सात महिन्यांचे बाळ असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाला जोडणारा रस्ता आणि नदीवरील पूल नसल्याने ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. अत्यवस्थ रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे दोन हजार ग्रामस्थांना या समस्येचा सामना करावा लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. रस्ता आणि पुलाच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर