
मुंबई, 24 ऑगस्ट (हिं.स.) - नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे पिंपळगाव बसवंत व परिसरातील नागरिकांना न्यायालयीन सेवा अधिक सुलभ आणि जलद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या न्यायालयासाठी मंजूर न्यायिक अधिकाऱ्यांच्या नियमित पदांमधून तसेच सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांमधून आवश्यक पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरासाठी एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एक अधीक्षक, दोन सहाय्यक अधीक्षक, एक लघुलेखक ग्रेड-२, दोन वरिष्ठ लिपिक आणि आठ कनिष्ठ लिपिक, अशी एकूण १५ नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय न्यायालयाच्या कामकाजासाठी बाह्ययंत्रणेद्वारे चार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये दोन शिपाई, एक पहारेकरी आणि एक सफाईगार यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे पिंपळगाव बसवंत आणि परिसरातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होऊन स्थानिक पातळीवर न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी