
सोलापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)सोलापुरात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकतेच विधिमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा झाला. या समितीने तीन दिवस बैठका आणि काही ठिकाणी भेटी देऊन आपला अंदाज घेत दौरा संपवला. माध्यमांना मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
दौरा संपलेल्या दिवशी शासकीय विश्रामगृहावर खासदार ज्योती वाघमारे यांनी या बैठकीला आलेल्या सर्व आमदारांचा सोलापुरी पद्धतीने सत्कार केला. यावेळी महापालिकेचे गटनेते अमोल शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.
याचवेळी अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या भेटीला सोलापुरातील एम आय एम चे प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेवक अजहर हुंडेकरी हे आपल्या नगरसेवकांसोबत शासकीय विश्रामगृहावर आले होते. गटनेते अमोल शिंदे यांनी व त्यांच्या सहकारी नगरसेवकांची खोतकर यांच्याशी भेट घालून ओळख करून दिली. यावेळी हुंडेकरी यांनी खोतकर यांना निवेदन देत चर्चा केली.
प्रभाग क्रमांक 20 मध्ये रस्त्याच्या अनेक समस्या आहेत. अमृत योजनेतून केलेल्या ड्रेनेज लाईनचे काम निकृष्ट झाले आहे.तसेच होटगी रोडचा सुरू असलेल्या रस्त्याबाबत ही नागरिकांमधून प्रचंड नाराजी आहे. कुमठा नाका ते सिद्धेश्वर साखर कारखाना हा रस्ता मंजूर असूनही होत नाही. याप्रकरणी आपण अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांना निवेदन देऊन चर्चा केल्याचे खंडेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड