
सोलापूर, 24 ऑगस्ट (हिं.स.)महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी माझी लाडकी बहीण योजना' सुरू करून राज्यातील कोट्यवधी बहिणींना खऱ्या अर्थाने भाऊ म्हणून आधार दिला. या योजनेमुळे बहिणीच्या संसाराला हातभार लागला आणि भावाचे प्रेम काय असते हे शिंदे यांनी दाखवून दिले.
या प्रेमाची परतफेड म्हणून रक्षाबंधनाचे औचित्य साधून *लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाला शिवसेनेची राखी* हा अनोखा उपक्रम सोलापुरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सोलापुरातून एक लाख राख्या गोळा करून आपल्या लाडक्या भावाला म्हणजेच एकनाथ शिंदे यांना पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
हा उपक्रम २४ ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सोलापुरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींकडून राख्या जमा करण्यात येणार असून अनेक ठिकाणी ३ दिवस राखी जमा करण्यासाठी बॉक्स ठेवण्यात येणार आहेत.सदर संकल्प राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. *सर्वसामान्य बहिणीचा सन्मान हाच एकनाथ शिंदे साहेबांचा खरा विचार आहे,* हाच विचार घेऊन आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.
संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रकाश राठोड, अध्यक्ष, सेवा फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. जमा झालेल्या राख्या प्रत्यक्ष मुंबई येथे जाऊन शिंदे यांना देण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी प्रकाश राठोड हे स्वतः दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. ते फक्त राखी जमा करत नाहीयेत, तर शिवसेनेची विचारधारा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि एकनाथ शिंदे यांचे कार्य घरोघरी लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवत आहेत.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड