अमरावती रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाचे स्प्रिंकलर बंद असल्याचा धक्कादायक खुलासा
तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह दोषींवर कारवाईची मागणी अमरावती, २४ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू
आगीवेळी स्प्रिंकलर पूर्णपणे बंद; जिल्हा स्त्री रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर


तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू

अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

दोषींवर कारवाईची मागणी

अमरावती, २४ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेची धक्कादायक बाब समोर आली आहे. आग लागली त्यावेळी रुग्णालयातील स्प्रिंकलर यंत्रणा बंद होती, अशी माहिती खुद्द जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.

आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत ती नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वाची असलेली स्प्रिंकलर यंत्रणाच कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंत्रणा बंद का होती, तिची देखभाल कोणाची जबाबदारी होती आणि याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले का, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

आगीच्या वेळी स्प्रिंकलर सुरू होते का, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी, “स्प्रिंकलर बंद होते, ही वस्तुस्थिती आहे, अशी स्पष्ट माहिती दिली. त्यामुळे नवजात बाळांच्या मृत्यूच्या या घटनेत रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.

नवजात बाळांसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या अतिदक्षता विभागात अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत का नव्हती, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. स्प्रिंकलर यंत्रणा बंद असण्यामागचे नेमके कारण काय होते, त्याची नियमित तपासणी आणि देखभाल झाली होती का, तसेच या निष्काळजीपणासाठी कोण जबाबदार आहे, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, माजी खासदार नवनीत राणा यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. स्प्रिंकलर बंद का होते, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

इतर नवजात बालकांना विविध रुग्णालयांत हलवले

आगीच्या घटनेनंतर नवजात बालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने अमरावती शहरातील विविध रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.

पंजाबराव देशमुख रुग्णालय: ११ बालके

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल: ५ बालके

मुरके हॉस्पिटल: ८ बालके

होप हॉस्पिटल: ६ बालके

पारिजात हॉस्पिटल: २ बालके

मातेसोबत ठेवण्यात आलेली: ४ बालके

स्थलांतरित बालकांवर मोफत उपचार

स्थलांतरित करण्यात आलेल्या सर्व बालकांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्याचे कडक निर्देश संबंधित सरकारी आणि खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. पालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

तीन निष्पाप नवजात बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यानंतर अमरावतीतील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्प्रिंकलर यंत्रणा बंद असतानाही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले का, यासह या दुर्घटनेमागील सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande