रत्नागिरी : अन्याय्य समुपदेशनाच्या निषेधार्थ शिक्षकांचे आंदोलन
रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्ह्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे समुपदेशन अन्यायकारक पद्धतीने झाल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणाऱ्या गण
प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन


रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्ह्यातील प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे समुपदेशन अन्यायकारक पद्धतीने झाल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणाऱ्या गणित आणि विज्ञान शाखेच्या ४७० जागांची भरती प्रक्रिया रद्द करून सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांच्या धर्तीवर सर्व कार्यरत पदवीधर शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेण्यात यावे, अशी मुख्य मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.

विषयानुसार वर्गीकरण न करता पदवीधरांचे थेट समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्याकडे शिष्टमंडळाने पाठपुरावा केला होता. पालकमंत्र्यांनी समुपदेशन प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या होत्या, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सुमारे २० ते २५ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण केलेल्या भाषा विषयांच्या शिक्षकांना उपशिक्षक पदावर नियुक्त करण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केला आहे. ही संपूर्ण समायोजन आणि भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जात असल्याचा आक्षेप घेत जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षक संघटनांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात हे आंदोलन छेडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande