

रायगड, 24 ऑगस्ट (हिं.स.)। कर्जत-कडाव रोडवरील कुंडलज गावाजवळ भरधाव इको कारच्या धडकेत ११ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. आर्या अनिल ठोंबरे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता सहावीत शिक्षण घेत होती. या घटनेमुळे कुंडलज परिसरात शोककळा पसरली असून ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्या ही कुंडलज गावातील रहिवासी असून भोईरवाडी येथील शाळेत शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसोबत घरी परतत होती. दरम्यान, कुंडलज गावातील गणपती मंदिर परिसरात कडावकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या एमएच ४६ बीव्ही ६१५३ क्रमांकाच्या इको कारने तिला जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, अलिबागच्या दिशेने निघालेला चालक अल्केश कर्णूक याच्या वाहनाकडून हा अपघात झाला.
धडक इतकी भीषण होती की आर्या गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने शाळा, गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिषा लटपटे, पोलीस शिपाई बबन घुले तसेच वाहतूक पोलीस आर. पी. नागे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आर्याचे वडील बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करतात. तिच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. शाळेतून निरागसपणे घरी परतणाऱ्या आर्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला हादरवून गेला असून नागरिकांकडून वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)