
बीड, 24 ऑगस्ट (हिं.स.)कुकडी प्रकल्पातून भोसे खिंडीद्वारे सीना मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याबाबत कुकडी सिंचन मंडळ, पुणे यांना यापूर्वी पत्राद्वारे सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मागील तीन आठवड्यांपासून सीना प्रकल्पात पाणी सोडण्यात येत होते. मात्र, पाण्याचा विसर्ग २०० क्युसेक्सपेक्षा कमी असल्याने अपेक्षित प्रमाणात पाणी सीना प्रकल्पात पोहोचत नसल्याची माहिती मिळाली.आज स्थितीला 310 क्युसेसने पाणी वितरण केले जात आहे.
याबाबत मा. धायगुडे साहेब (कार्यकरी अभियंता सीना कोळेगाव) यांच्याशी संपर्क केला असता रुईगव्हाण येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने कालव्याच्या प्रवाहावर सिमेंट पाईप टाकून पाण्याचा मार्ग बंद करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कालव्यातून अपेक्षित क्षमतेने पाणी सीना प्रकल्पात पोहोचत नव्हते.या पार्श्वभूमीवर तातडीने संबंधित प्रशासनाशी संपर्क साधून हा अडथळा दूर करण्याची विनंती केली. त्यानुसार पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी संबंधितांना सूचना देऊन रुईगव्हाण येथील रस्त्याचे काम पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे कुकडी धरणातून सीना प्रकल्पाकडे ४०० क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर सीना प्रकल्पातील पाणी तातडीने मेहकरी प्रकल्पाकडे सोडण्यात येणार आहे.या निर्णयामुळे आष्टी तालुक्यातील सीना प्रकल्पालगतच्या गावांचा तसेच टँकरद्वारे सुरू असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis