
मागील वर्षी ८३ टक्के साठा, यंदा केवळ ५६ टक्के; दमदार पावसाची प्रतीक्षा
अमरावती, २४ ऑगस्ट (हिं.स.) : पश्चिम विदर्भातील सर्वांत महत्त्वाच्या अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात यंदा मोठी घट झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत धरणात तब्बल ८३ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र हा साठा घटून अवघ्या ५६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २७ टक्के जलसाठा कमी असल्याने आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यंदाचा पावसाळा अंतिम टप्प्यात पोहोचला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा अमरावती जिल्ह्यातील पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे धरणातील घटता साठा प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे.
दमदार पावसाची प्रतीक्षा
येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शेती आणि उद्योगांसाठी करण्यात येणाऱ्या पाणी आरक्षणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
विशेषतः खरीप हंगामानंतर रब्बी पिकांसाठी पाण्याची मागणी वाढणार असल्याने धरणातील उपलब्ध साठ्याचे महत्त्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे.
अमरावतीकरांचे लक्ष पावसाकडे
पावसाळ्याचे काहीच दिवस शिल्लक असताना मागील वर्षाच्या तुलनेत धरणात तब्बल २७ टक्के कमी जलसाठा आहे. त्यामुळे अमरावतीकरांचे लक्ष आता पावसाकडे लागले आहे.
आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणी कपात किंवा पाणी आरक्षणात बदल करण्याची वेळ येऊ शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणारा आगामी पाऊस अमरावती जिल्ह्यासाठी निर्णायक ठरणार आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी